आमच्या मुळावर उठण्याचे काम परबांनी केले; रामदास कदम

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब पक्षविरोधी कारवाई करुन शिवसेनेच्या मुळावर उठलेत असा आरोप शिवसनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला आहे. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टची माहिती भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर होता. या आरोपांवर खुलासा करताना कदम यांनी अनिल परबांवर घणाघात केला आहे. अनिल परब शिवसेना प्रमुख आहेत की उद्धव ठाकरे आहेत? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आपला काहीही हात नसल्याचेही पुन्हा एकदा रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात अनेक आरोप आणि गौप्यस्फोट केले आहेत. अनिल परब मंत्री झाल्यावर दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संपवण्याचे काम करत आहेत. स्वतःच शिवसेना प्रमुख असल्यासारखे अनिल परब वागत आहेत. मला बदनाम आणि राजकारणातून संपवण्यासाठी अनिल परब षडयंत्र रचत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनिल परब यांच्याविरोधात अनेक पत्र पाठवले आहेत. अनिल परब कशाप्रकारे शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत याची सगळी माहिती ठाकरेंना दिली आहे. माझ्या मुलाने शिवसेना नेते आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांना माहिती दिली आहे. योगेश कदम हा स्थानिक आमदार आहे. योगेशची आमदारकी जाण्यासाठी अनिल परब प्रयत्नशील असल्याचा आरोपही अनिल परब यांच्यावर रामदास कदम यांनी केला आहे.