आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती, पंकजा मुंडे म्हणतात…

औरंगाबाद: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मी आधीच उपाशी आणि त्यात आजच उपास म्हणजे बहुजनांसारखी अवस्था झाली आहे. जेव्हा आपल्याला हक्क पाहिजे होते तेव्हा मिळाला नाही. जेव्हा आपल्याला समानता पाहिजे होती, मंच पाहिजे होता मंच मिळाला नाही. असं उपाशी ठेवलं ठेवलं आणि जेव्हा आपल्याला मिळेल असं वाटत होत तेव्हा आपल्याला उपाशी ठेवण्यात आलं असे उदाहरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. भाजपने ओबीसी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात पंकजा मुंडेंनी राज्य सरकारमुळेच आरक्षण गेलं असल्याचा आरोप केला आहे.

अनेक वर्ष राजकारणात असे गेले की, लोकं आपली आडनावं बदलून लावायचे त्यात कळायचे नाही की त्याची जात कोणती आहे. भाजपमध्ये असं लावा, राष्ट्रवादीत असं लावा आणि काँग्रेसमध्या गेलं की असं लावा अशी परिस्थिती होती. जातीवाद होता अजूनही गावात जातीच्या भींती संपुष्टात आल्या नाही. अजूनही गावात गेलं की वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जावं लागते. अशी परिस्थिती आहे. संतांचा महाराष्ट्र आणि पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात ओबीसींची परवड का ? असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

बहुजन म्हणजे जास्त संख्येनं असलेला बहुजन आजही जातीपातीच्या बळावर गावांमध्ये अत्याचार होतात असे पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० टक्के आरक्षण दिलं आहे. ज्यांची आर्थिक ताकद नाही अशा लोकांना १० टक्के आरक्षण दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस होते त्यावेळी ओबीसींचे ५० टक्केचे आरक्षण करण्याचे डोक्यात होते परंतु हे सरकार आल्यानंतर ते ५० टक्क्यांच्या खालचेही आरक्षण गेलं आहे. मराठा आरक्षणही ज्या मुख्यमंत्र्यांची जात काढण्यात आली त्याच मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात आलं. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या समोर टांगती तलवार देण्याचे काम केलं आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.