भिवंडीतील आग अखेर आटोक्यात, 50 हून अधिक दुकानं जळून खाक
भिवंडी: भिवंडी शहर व नजीकच्या गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना नित्याच्या झाल्या असून शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी हद्दीतील चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर बनविणाऱ्या कारखान्यांना लागलेल्या आगीत तब्बल 50 हून अधिक गोदाम जळून खाक झाली. ही आग आता नियंत्रणात आलीय. या आगीत 50 हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत.
या सर्व कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड, कापूस, फोम आणि रेक्झीन साठविलेले असल्याने ही आग पाहता पाहता सर्व कारखान्यात पसरुन सर्व कारखाने जळून बेचिराख झाले आहेत. या आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझविली.
दरम्यान, येथील आग ही शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सर्व कारखाने हे पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने ही आग सर्वत्र पसरली. ज्यामुळे कोट्यावधी रुपयांचे साहित्य कच्चा माल जळून खाक झाला आहे. घटनास्थळी पाण्याची उपलब्धता नसल्याने आग विझविण्यात अडथळा येत होता. मात्र, पाणी नियमित उपलब्ध झाल्याने आग पूर्णतः नियंत्रणात आली आहे. अशी माहिती ठाणे बाळकुम अग्निशामक केंद्रातील अधिकारी हिंदुराव बोंडवे यांनी दिली आहे.