देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे – शरद पवार

पिंपरी: राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या धाडी आणि छापेमारीच्या सत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआय अशा यंत्रणांकडून त्रास दिला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागानं अन्य लोकांना त्रास दिला. आता अजित पवार आणि त्यांच्या बहिणींना त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय.
केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी केल आहे.
महाराष्ट्रातील लोकांची सुख दु:ख समजून घ्यावं हे केंद्र सरकारला सांगण्यासाठी मी जिल्ह्या जिल्ह्यात जात आहे. राज्यात जिथं जाणं शक्य आहे, तिथे जाण्याचा प्रयत्न करणार. एक बातमी पक्की असते की पेट्रोल-डीझेल, गॅसच्या किमती किती वाढल्या. आपल्या भगिनींच्या संसाराचं बजेट कसं कोलमडून पडेल ही बातमीही असतेच. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा आजचे सत्तेतील लोक आंदोलन करत लोकसभेचं सभागृह बंद पाडत होते. पी. चिदंबरम यांच्या आजच्या लेखात त्यांनी सांगितलं की 25 टक्के कर जरी केंद्र सरकारनं कमी केला तरी किंमत कमी होईल. पण केंद्र सरकार ते करताना दिसत नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.