माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नाही – मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मात्र या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या या पोस्टवर विश्वास ठेवू नये असून त्यात तथ्य नाही असं दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शुक्रवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास होतो आहे. पंढरपूरमध्ये जेव्हा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे कार्यक्रमात सहभागी झाले होते तेव्हा त्यांनी कॉलर लावली होती हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेच. उद्या सकाळी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे असं समजतं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे HN रिलायन्स रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या आज विविध चाचण्या करण्यात आल्या. हे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी ठाकरे कुटुंबीयांशी चर्चा केली. शुक्रवारी सकाळी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. वैद्यकीय तपासणीबाबत रूग्णालयाने कोणतंही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध केलेलं नाही.

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातील विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. पण, या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे, अशी पोस्ट मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!