देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चेला उधान

मुंबई: राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही कौटुंबीक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. पण ही कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आज अचानक राज ठाकरे यांच्या घरी आले. ही कौटुंबीक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात हे दोन्ही नेते हास्यविनोद करताना दिसत आहेत.

राज ठाकरे हे शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राहायला आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्या घरी सपत्नीक आले होते. यावेळी राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं. राऊत हे राज यांच्या घरी सुमारे अर्धा तास होते. या दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही राज यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज फडणवीसांनी राज यांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.