अतिशय धक्कादायक बातमी: अनाथांची माय हरपली…. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन

पुणे: अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने मंगळवारी पुण्यात निधन झाले. पुण्याच्या कोथरूड येथील गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हर्नियाचे ऑपरेशन झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नुकताच पद्मश्री पुरस्काराने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

 

हजारो अनाथ मुलांच्या आश्रयदात्या म्हणून त्यांना २०१२ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारही मिळाला होता. तसेच नुकतच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ७५२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पोचपावती होय. अतिशय संघर्षाच्या अशा परिस्थितीत त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ गेला होता. लहान वयातच म्हणजे ९ वर्ष वय असताना त्यांचा विवाह झाला. कौटुंबिक त्रासाला सामोरे जावे लागतानाच शिक्षणही जेमतेम चौथी पर्यंतच झाले. पण आपल्या मुलीसह बेवारस मुलांना त्यांनी ममता बाल सदनाच्या माध्यमातून आधार दिला.

१९९४ साली त्यांनी पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात एक संस्था उभारली. आपल्या पोटच्या मुलीसह त्यांनी इतर अनाथ बेवारस मुलांना आधार दिले. या संस्थेकडून शिक्षणासह, भोजन, कपडे आणि अन्य सुविधाही देण्यात येतात. मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे यासाठी प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण झाल्यावर योग्य जोडीदार शोधून देऊन विवाहदेखील करण्यात येतो. त्यांच्या संस्थेत आतापर्यंत १०५० मुलांनी आश्रय घेतला आहे.