शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

8

मुंबई: शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राजस्थानमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या काही काळात सेक्सटॉर्शन किंवा हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

तक्रारदार शिवसेना आमदार हे मुंबईतून सलग दोन वेळा विधानसभा आमदार आहेत. त्यांना 20 ऑक्टोबरच्या रात्री मोबाईलवर एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. तक्रारदार आमदाराने प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. चॅटद्वारे या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. त्यानुसार आमदाराने मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदाराला एका महिलेचा व्हिडीओ कॉल केला. महिलेने सुमारे 15 सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली.

फोन कट होताच आमदाराच्या मोबाईलवर एक व्हिडीओ पाठवण्यात आला होता. आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करत त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आमदाराने मुंबईत पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आरोपीचा राजस्थानातील भरतपूर येथे शोध लागला. भरतपूर येथील सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून पकडले. लवकरच या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.