पगार वाढ नको; एसटी कर्मचारी विलिनीकरणावर ठाम; गाजर दाखवत केला सरकारचा निषेध

पुणे: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, हीच आमची मुख्य मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गाजर दाखवू नये, सरकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता संप सुरुच राहील, अशी भूमिका पुण्यातील स्वारगेट आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) येथील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २४) स्पष्ट केली.

तसेच सरकारच्या या निर्णयाविरोधात सांगलीमध्ये आंदोलकांनी गाजर दाखल अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आम्हाला पगारवाढ नको आहे, विलीनीकरण करा, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशाराही यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आमचे विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. विलीनीकरण हाच एकमेव संपावर तोडगा काढण्याचा मार्ग असताना सरकारने आम्हाला पगार वाढीचे गाजर दाखवले. आम्हाला पगारवाढ नको, विलीनीकरण हवे आहे, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत विलवनीकरण होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशाराही या कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे राज्यातील अनेक आगारामधील कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत विलनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याची सामुहीक शपथ घेतली आहे.

‘‘ज्यांचे निलंबन करण्यात आले, त्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली. तसेच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे,’’ अशी घोषणा बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. तसेच गुरुवार (ता.२५) पासून कामावर हजार होण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना परब यांनी केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांनी या घोषणेकडे केवळ सरकारने पुढे टाकलेले एक सकारात्मक पाऊल म्हणून पहिले असून त्याचे स्वागत केले आहे. मात्र या घोषणेला बळी पडणार नसून आमची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे हीच आहे, पगारवाढ करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेणे म्हणजे एसटी संपात फूट पाडण्याचा डाव आहे, घोषणा करायचीच असेल तर विलीनीकरणाची करा, तरच संप मिटेल, असे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.