केंद्रीय यंत्रणांकडून माझा अनिल देशमुख करण्याचा डाव, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुखयांना ज्याप्रमाणे खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यात आले. त्याप्रमाणे माझ्याविरोधात त्याच पद्धतीने षडयंत्र रचले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा खोटी माहिती देवून मला त्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप करतानाच या प्रकरणाची मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लवकरच तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट केंद्रीय तपास यंत्रणांवरच हल्ला चढवला. मात्र, नेमकी कोणती केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्याविरोधात षडयंत्र रचत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. अनिल देशमुखांशी जो खेळ खेळण्यात आला. तोच खेळ माझ्यासोबत खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याची माहिती मला मिळाली आहे. पुरावे आले आहेत. माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली आहे. मी त्याचीही माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देणार आहे, असं मलिक म्हणाले.

खोटी तक्रार करून देशमुखांविरोधात कारवाई झाली. मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचे माझ्या हातात पुरावे आले आहेत. केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी माझ्याविरोधात मसुदा तयार करून व्हॉट्सअॅपवर पाठवत आहेत. काही लोकांना माझ्याविरोधातील मजुकराचा ईमेल करत आहे. या माहितीच्या आधारे खोटी तक्रार करत आहेत. मला अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणा करत आहे. ते सहन करणार नाही. त्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असून केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावेही पोलिसांना देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.