राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा अजून तीन दिवस कोठडीत मुक्काम

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयानं देशमुख यांना तीन दिवसांची ईडी कोठडी म्हणजेच, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावलीय.

अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. 6 तारखेला त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांच्या कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला.

देशमुख ईडीला सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद सिंग यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देशमुख यांना तीन दिवस ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे.

अनिल देशमुख यांना एका पत्रातीला आरोपामुळे तुरुंगात जावं लागलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली होती.