”महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांना ‘हे’ नियम पाळावेच लागतील”
मुंबई: कोरोना व्हायरसचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव आतापर्यंत 25 देशांत झाला आहे. धक्कादायक म्हणजे पुढील काही दिवसांत ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव अजून वाढेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. देशातही ओमिक्रॉनचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरटीपीसीआर चाचणीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य असेल. 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवावा लागणार आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे प्रत्येकानं खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे
अजित पवार म्हणाले, एखाद्या व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधत्मक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्याला आरटीपीसीआर टेस्टची गरज नाही, असा केंद्र सरकारचा नियम आहे. परंतु महाराष्ट्रात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल करण्यात आले आहे. अजित पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीतील तफावत दूर करण्यात आल्याचं यावेळी स्पष्ट केलं आहे. नियम सर्वांसाठी सारखे असावेत, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
भारतात कोणत्याही विमानतळावर विदेशातून प्रवाशी आला तरी त्याच्यासाठी नियम हे सारखेच असावेत. त्यानुसार इतर राज्यातून येताना दुसऱ्या राज्यात जाताना आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो तर आपल्याकडे येताना रिपोर्ट दाखवावा लागेल. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य करण्यात आली असून आता केंद्राशी चर्चा करुनच आता नवीन नियमावली येईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.