आम्ही संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज(रविवार) बारामती दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावला आहे. आम्ही संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने आम्हाला त्यामध्ये यश आलं नाही. लोकशाहीमध्ये काही उमेदवार उभे राहतात. त्याचप्रमाणे ते उभे आहेत. आम्ही आमच्या निवडीनुसार आणि विचारधारेनुसार लोकं निवडूण देण्याचा प्रयत्न करत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, हवेली आणि पुणे, पिंपरी-चिंचवड यांचा विचार करता सर्वात जास्त मतदान दुसऱ्या क्रमाकांवर बारामतीचं आहे. अ,ब,क,ड आणि ई अशा स्वरूपात एकूण सातशे मतं आहेत. गेल्या ३० वर्षांपासून बँक आम्ही चांगल्या प्रकारे चालवत आहोत. त्यामुळे यावेळी सुद्धा लोकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे, असं पवार म्हणाले.

या बँकेबाबत भाजपकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, बिनविरोध जागा मिळण्यामध्ये आम्हाला खरं यश आलं. मात्र, आता शिरूर आणि मुळशीसाठी निवडणूक होती. हवेलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. कारण तिथे दोन्हीही आमच्याच विचारांची लोकं आहेत.