५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाची चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. यात अनेक नेत्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहेत. यातच राज्यातील सर्वाधिक पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी “५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा” असे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भातील गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांना नियमांचे पालन करावे लागेल. असेही ते म्हणाले.
यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “निर्बंध कडक करण्यासंदर्भातील निर्णय बुधवारी झालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आरोग्य मंत्री देखील उपस्थित होते. ते एकत्रितपणे सर्व निर्णय घेतील. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मागील वर्षाप्रमाणे यंदाही आरोग्य व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे.” असंही ते म्हणाले.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ही रुग्णसंख्या वाढतेय असे म्हटले जातेय. यातच मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत मुंबईत 9510 पोलीस कर्मचारी बाधित आढळले आहे. याशिवाय आजपर्यंत 123 पोलिसांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील पोलीस दल देखील पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये आता पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.