नाशिकमध्ये विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात; एकाच शाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नाशिक: कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची  जगभरात दहशत आहे. त्याचबरोबर देशासह राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. अशातच नाशिककरांसाठी धोक्याची घंटा आहे. इगतपूरी  तालुक्यातील मुंढेगाव आश्रम शाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकाच शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी यातील काही विद्यार्थ्यांना कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आली होती. त्यांची एंटीजन चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आलेत. आता सर्वच विद्यार्थ्यांची RT-PCR टेस्ट करण्यात आली आहे. RT-PCR टेस्टचा रिपोर्ट काय येतो याकडे जिल्हा प्रसासनाचं लक्ष लागलं आहे. आदिवासी आश्रम शाळेत 300 हून अधिक विद्यार्थी असल्याचं समजतं. राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना ही धक्कादायक बाब समोर आल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

राज्यातील ग्रामीण भागात पहिलीपासून शाळा सुरु झाली असली तरी महत्त्वाच्या शहरांमध्ये पहिलीपासूनचे वर्ग अजूनही बंद आहेत. अशातच नाशिक महापालिका हद्दीतील सर्व शाळा 13 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 डिसेंबरपर्यंत नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटची स्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार होता. त्यानुसार आता अखेर 13 डिसेंबरपासून नाशिक पालिका हद्दीतील शाळा सुरु होणार आहे.