“संप तुटेपर्यंत ताणू नये, ज्यादिवशी तुटेल तेव्हा परत जोडलं जाऊ शकणार नाही”
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ देण्यात आली असून विलीनीकरणाच्या प्रश्नासाठी समिती नेमण्यात आली आहे. अशावेळी लाखो प्रवाशांना वेठीस धरुन काही एसटी कामगारांनी आपला संप सुरु ठेवला आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून संप मागे न घेतल्यास मेस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) अंतर्गत कारवाई करावी लागेल असा इशारा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे. एसटी कर्मचारी आंदोलन आणि राज्य सरकारची भूमिका याविषयी अनिल परब यांच्याशी लोकसत्ताचे सहयोगी संपादक संदीप आचार्य यांनी बातचित केली. यावेळी बोलताना त्यांनी तुटेपर्यंत ताणू नका असंही एसटी कर्मचाऱ्यांना सांगितलं.
“एसटी रोज नुकसान सहन करत आहे. आज जवळपास ४५० कोटींचं नुकसान झालं आहे. कोविड काळात परिस्थिती बरोबरीने सुरु होती. कधीही एसटीला राज्य शासनाकडे पैसे मागावे लागले नव्हते. पण कोविड काळात १२ हजार कोटींचा संचित तोटा आहे. मात्र यानंतरही एसटी महामडंळाने अतिरिक्त भार घेतला. असं असतानाही जे कर्मचारी आडमुठेपणा घेत आहेत ते एसटीसोबत स्वत:चंही आणि लोकांचंही नुकसान करत आहेत,” असं अनिल परब यांनी सांगितलं.
“कॉलेज, शाळेचे विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक यांच्यासोबत एसटीवर अवलंबून सर्वांचे हाल होत असून कारवाईसाठी शासन सर्व पर्याय तपासून पाहत आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. अनिल परब यांनी यावेळी मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा देताना संपात ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फे केलं आहे त्यांना पुन्हा सेवेत घेतलं जाणार नाही अशी माहिती दिली.
“१२ आठवडे एसटी संप सुरु ठेवू शकत नाही. आम्ही बोलायचं कोणाशी हा प्रश्न आहे. ज्या २८ युनियन आहेत त्यांचं ते मानत नाहीत. जे भाजपा आमदार नेतृत्व करत होते त्यांना माझा मुद्दा पटला आणि माघार घेतली. गुणरत्न सदावर्ते नेतृत्व स्विकारलं आहे, पण ते विलीनीकरणाशिवाय दुसऱ्या मुद्द्यावर बोलण्यास तयार नाहीत. मग मी बोलायचं कोणाशी?,” अशी हतबलता अनिल परब यांनी व्यक्त केली.
“तुम्ही सगळे मिळून विलिनीकरणाशिवाय चर्चा नाही असंच म्हणणार असाल तर मग एसटीचं फार नुकसान होत आहे. संप तुटेपर्यंत ताणू नये. ज्यादिवशी तुटेल तेव्हा परत जोडलं जाऊ शकणार नाही. फार वाईट परिस्थिती होईल,” असंही यावेळी ते म्हणाले.