पेपरफुटीत कोणताही मंत्री अडकणार नाही, आमची यंत्रणा सक्षम, दुसऱ्याला निमंत्रण कशाला?; बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांना टोला

मुंबई: पेपरफुटीत कुठलाही मंत्री अडकण्याचा विषय नाही. यात जो जो दोषी असेल त्याला शिक्षा झालेली दिसून येईल. आमची यंत्रणा सक्षम आहे त्यामुळे दुसऱ्याला निमंत्रण देण्याची गरज काय ? असा टोला सीबीआय चौकशीच्या मागणीवरून बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना केंद्राने गरिबांच्या खिशातून पैसे काढले. याउलट जीएसटीचे पैसे आजही आम्हाला मिळत नाहीत. आम्ही पगारासाठी, विकास कामासाठी कर्ज काढतोय, केंद्राकडून पैसे मिळण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले तर जास्त चांगलं होईल, असेही ते म्हणाले आहेत.

कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचे देशाने कौतुक केले. मात्र आज ते आजारी आहेत अशा प्रसंगी त्यांच्यावर टीका करू नये असं मला वाटतं. चंद्रकांत पाटील एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, असे संकेत सगळ्यांनीच पाळले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. तसेच लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षांची निवड होते ती पद्धत आम्ही स्वीकारली आहे. विधानपरिषदेत ही तशीच प्रक्रिया असते. सोमवारी ही निवडणूक जाहीर केली जाईल आणि मंगळवारी प्रक्रिया पूर्ण होईल. अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सोनिया गांधी ठरवतील, तो आम्हा सर्वांना मान्य राहील अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष निवडीवर बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

नियम हे सर्वांनासाठी सारखेच आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जी नियमावली दिलीय त्यानुसार काम करावे लागते. राहुल गांधी यांचा 28 तारखेचा मुंबईतील ‌कार्यक्रम रद्द करण्यात आला.तसेच काँग्रेस पक्षाकडून देखील नियम पाळण्याच्या‌ सुचना आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी जे पी नड्डा यांच्या दौऱ्याबाबत बोलताना दिली आहे. शिवसेनेने दसरा मेळावा षण्मुखानंद हॉल येथे घेतला तर 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनासही काही निर्बंध घातले होते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध घातले जात असतील तर ते नियम सर्वांसाठीच आहेत, असेही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!