एसटी राज्यात सुरळीतपणे सुरू करा, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवार यांचं आवाहन

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप राज्यात सुरू आहे. एसटीच्या परिवहन मंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अशात आता यासंदर्भात शरद पवारांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. एसटी कामगारांच्या २२ संघटनांच्या कृती समितीने शरद पवारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला अनिल परबही उपस्थित होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रूजू व्हावं असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे राज्यभरातील प्रवासी प्रभावित झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याचं वर्णन न केलेलं बरं असं शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. त्यातच कोरोनाचा ओमिक्रॉन नावाचा नवा अवतार आल्यानं देशावर आणि राज्यावर संकट आलंय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राज्यातील अर्थकारणावर होतोय. त्यामुळे राज्यातील राज्य सरकारला त्याची मोठी आर्थिक किंमत द्यावी लागते आहे, असे पवार म्हणाले.

एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार शरद पवारांनी आज थेट भाष्य केलं. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, ‘आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. एसटीची बांधिलकी ही प्रवाशांशी आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही.’ दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!