विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप महाविकास आघाडी सरकारला ‘या’ मुद्यावर कोंडीत पकडणार?

मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  देखील विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित असतील. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

विरोधकांनी चहापानावर देखील बहिष्कार टाकला होता. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षण, महिला सुरक्षा, नोकर भरती गोंधळ, आरोग्य भरती गोंधळ, महावितरणकडून करण्यात येणारी सक्तीची वसुली या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारकडून विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील आज पार पाडली जाईल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी राजीनामा देत पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानं हे पद रिक्त आहे. गेल्या अधिवेशनाचं कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिलं. तर, काँग्रेस देखील या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आक्रमक झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदी कोण उमेदवार असेल हे मात्र, काँग्रेसनं स्पष्ट केलेलं नाही. आवाजी मतदानानं विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन भाजपनं ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडलं आहे.