ओमिक्रॉन व्हेरिएंटची धास्ती: केंद्राकडून राज्यांना अलर्ट, नाईट कर्फ्यूसह लग्न, सभांवर पुन्हा निर्बंध?

मुंबई: कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येईल, असा इशाराही दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवलं असून, महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लग्न समारंभासह गर्दी होणाऱ्या सर्वच कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्याचा सल्ला केंद्राने दिला असून, त्यामुळे लग्न समारंभासह सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता वाढली आहे.
देशातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत एकूण 220 रुग्ण आढळून आले आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवलं आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा तीनपट अधिक असून, वॉररुम पुन्हा सुरू करण्यात याव्यात, असा सल्ला केंद्राने या पत्रामध्ये दिला आहे. त्याचबरोबर कोरोनाशी संबंधित सर्वच परिस्थितीवर नजर ठेवून जिल्हास्तरावरही कडक आणि तत्काळ पावलं उचलण्यात यावीत, असं केंद्राने या पत्रामध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे राज्यांना हे पत्र पाठवलं आहे. चाचण्या वाढवून परिस्थितीवर लक्ष्य ठेवण्याबरोबरच रात्रीची संचारबंदी, गर्दी होणाऱ्या मोठ्या सभांवर बंदी, लग्न आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मर्यादीत लोकांना परवानगी आदी उपाययोजना करण्यात याव्यात, असं या पत्रात म्हटलं आहे.