….तर मग मुंबईत लॉकडाऊन लागणार, राजेश टोपेंकडून संकेत
मुंबई: राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. यातच मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये दैनंदिन वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईची चिंता लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत 7 जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू केली आहे. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
मुंबईत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर राजेश टोपे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. मागील 2 वर्ष कोरोनामध्येच गेल्यामुळे हा नवीन वर्ष तरी काही नवीन घेऊन येईल. असे लोकांना वाटत होते. मात्र राजेश टोपे यांच्या लॉकडाऊनच्या संकेतामुळे लोकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, कोविड पॉझिटिव्हिटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त झाला तर राज्य सरकारला निर्बंध परत आणण्याचा विचार करावा लागेल. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच कोविड टास्क फोर्सची बैठक घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे.
‘राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. मुंबईचा सध्याचा सकारात्मकता दर 4 टक्के आहे. जर हा दर 5 टक्केच्या वर गेला तर सर्वत्र बंदी घालण्याचा विचार करावा लागेल.’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, टोपे यांच्या अशा वक्तव्यानंतर मुंबईमध्ये केव्हापासून लॉकडाऊन लागू शकतो याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.