समीर वानखेडेंकडून चैत्यभूमीवर अभिवादन, वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी, तर मलिक म्हणाले…
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबईत दादरमधील चैत्यभूमीवर हजेरी लावली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वानखेडेंनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केले. दरम्यान यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि समीर वानखेडे यांच्यात चर्चा झाली. मात्र ही चर्चा नेमकी कशावर झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. तर दुसरीकडे, वानखेडेंच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली.
अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही चैत्यभूमीवर दाखल झाले. त्याचवेळी समीर वानखेडेंच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली. वानखेडेंच्या मुद्द्यावरुन समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही. असं म्हणत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी विरोध केला.
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?
नवाब मलिक म्हणाले की, बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाचाच आहे. तो कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा. काही लोकांनी नव्यानं इथे येण्यास सुरुवात केली हे चांगलंच आहे. मी जो संघर्ष सुरु केलाय त्याचा जयभीम इम्पॅक्ट आता सुरु झाला आहे. समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादनाकरता आले का नाही हे मला माहित नाही पण, ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे, असं मलिक म्हणाले.