प्राथमिक शाळांमध्ये ऐकू येणार किलबिलाट; आज पासून नाशिक ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार
नाशिक: महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर ऑफलाईन शाळा मार्च 2020 पासून बंद होत्या. कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य सरकारनं 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. ओमिक्रॉन वेरिएंटच्या संकटाच्या मात्र, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.
नाशिकमध्ये अखेर आजपासून शाळा सुरु करण्यात येत आहेत. नाशिकच्या ग्रामीण भागात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू होणार आहेत.तर शहरात पाहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू होणार आहेत. अनेक शाळांमध्ये फुल उधळून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शहरात पहिली ते सातवी च्या 504 शाळांमध्ये 1 लाख 85 हजार विद्यार्थी आहेत.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र असताना राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला.मात्र, ओमिक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात दक्षता घेतली जात आहे.
नाशिकमधील शाळा राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीचं पालन करुनचं केल्या जाणार असल्याचं नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं होतं. आता नाशिक जिल्हा प्रशासनानं शाळा सुरु करण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.