‘पुष्पोत्सव 2023’चा समारोप,फुले, फळे, झाडांच्या स्पर्धात्मक प्रदर्शनाला लाखो नाशिककरांचा उस्फुर्त प्रतिसाद

11
नाशिक : नाशिक महानगरपालिकेचा उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग आणि नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटीझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजीत ‘पुष्पोत्सव २०२३’चा आज तिसऱ्या दि. २६ मार्च रोजी समारोप झाला. शेवटच्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे दोन लाख लोकांनी तीन दिवसात पुष्प महोत्सवाला भेट दिली. विक एन्ड असल्याने पुष्पप्रेमींसह अनेक नागरिकांनी आवर्जून मनपा मुख्यालयाला भेट देउन फुलांची रंगेबेरंगी दुनिया अनुभवली. नागरिकांनी शनिवारी, रविवारी संध्याकाळी रांगा लावून प्रदर्शनाचा आनंद लुटला. संध्याकाळी प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे, चिन्मय उदगिरकर उपस्थित होते. उद्यान विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही अभिनेत्यांनी मुख्यालयातील विविध स्टॉलला भेट देउन पाहणी केली. फुलांच्या जाती आणि कुंड्यांच्या सजावटीला दाद दिली. वैशिष्ट्यपूर्ण फुलांची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायक्लोन ग्रुप डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी ‘गोदा तिरी स्वच्छतेची वारी’ विषयावर पथनाट्य सादर केले. डॉ. विजयकुमार मुंढे यांनी भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री शिवकांता सुतार यांचा सत्कार केला.
भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदी शैलीत भाषण करून उपस्थितांना हसविले. नाशिकच्या समृद्धीत गोदावरीचा वाटा आहे. तिला स्वच्छ ठेवा. नागरिकांनीही जबाबदारीने वागून परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले. चिन्मयने पुष्पोत्सवाचे कौतुक करून गोदावरी बारामाही वाहती करणे, पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करणे नाशिककरांचे कर्तव्य आहे, असे भाषणात सांगितले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने आणि सदस्यांचा, छायाचित्र स्पर्धेचे नियोजन करणारे योगेश कमोद, मनपाचे सहा उद्यान निरीक्षक, संतोष मुंढे यांचा सत्कार करण्यात आला. मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी, विभागीय अधिकारी मयूर पाटील, आयटी विभाग संचालक नितीन धामणे, सुरक्षा अधिकारी मधुकर शिंदे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यावेळी उपस्थित होते. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.
पुष्पोत्सवाशी नाशिककरांचे घट्ट नाते
पुष्पोत्सवामुळे मनपा आणि नाशिककरांचं नातं आणखी घट्ट होणार आहे, असा सूर उमटत आहे.’पुष्पोत्सव’मध्ये विविध गटात सुमारे ७५० प्रवेशिका आल्या होत्या. ३१ नर्सरी व ११ फूड स्टॉल होते. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपींग ठरले. मनपा मुख्यालयातील तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी होती. विविध पुष्पे, मोसमी फुले, फळे,भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय आणि कॅक्टसच्या शोभिवंत कुंडया ठेवल्या आहेत. जमिनीवरील आणि हँगिंग असे दोन्ही प्रकार पुष्पप्रेमींना भावले. उद्यानांच्या सहा प्रतिकृतीचेही नागरिकांनी कौतुक केले. पुष्पोत्सवातील प्रांगणातील ३६० डिग्री सेल्फी आणि आतील लॉन्स कारंजा येथील सेल्फी पॉईंटवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी संपूर्ण कुटुंबाचा फोटो इथे काढला. भारत गणेशपुरे यांनीही सेल्फी काढला.
विजेत्यांचा सत्कार
‘पुष्पोत्सव 2023’ निमित्त आयोजित हौशी, व्यावसायिक आणि प्रेस फोटोग्राफर स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षक निसर्ग छायाचित्र तज्ञ डॉ. श्रीश क्षीरसागर, चित्रकार तथा मूर्तिकार श्याम लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मनपाच्या सहा विभागीय कार्यालयांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेवर साकारलेल्या उद्यान प्रतिकृतीत प्रथम आलेला सातपूर विभाग, द्वितीय नवीन नाशिक विभाग, तृतीय पंचवटी विभागाचा यावेळी सत्कार करण्यात आला. इएसडीएस वास्तू ग्रुप, ठक्कर ग्रुप ट्रॉफी प्रायोजक होते.
गणेशपुरेंचे स्किट आणि हास्याचा धबधबा
लग्न झाल्यानंतर सासरी कसे वागावे याचे प्रशिक्षण केंद्र काढल्यावर कसे गमतीचे अनुभव येतात याचे सादरीकरण गणेशपुरे यांनी अभिनेत्री शिवकांता सुतार यांनी केले. सासू, सासरा, नवरा यांच्याशी कसे वागावे, बायकोने नवऱ्याला कसे सुनवावे?, आणि नवरा अस्वस्थ होईल यासाठी रडण्याचे तीन प्रकार सांगताना नाशिककर नागरिक हसून हसून बेजार झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.