काळजी घ्या नियम पाळा! राज्यात ८ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद

32

मुंबई: राज्यात ओमिक्रॉनमुळे चिंता वाढताना दिसत आहे. राज्यात आज ८ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २८वर पोहोचली आहे. काल आढळलेल्या ८ रुग्णांमध्ये ३ महिला असून ५ पुरुष आहेत. तसेच ३ रुग्ण लक्षणे विरहित असून ५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. या ८ रुग्णांपैकी ७ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले असून एकाचे लसीकरण झालेले नाही. दरम्यान देशात सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

राज्यात दररोज ओमिक्रॉनची रुग्णांची भर पडत आहे. काल राज्यात ८ ओमिक्रॉन रुग्ण आढळले असून यापैकी ७ रुग्ण मुंबईतील आणि १ रुग्ण वसई विरार येथील आहे. आता ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २८वर पोहोचली आहे. आज नोंद झालेल्या ८ रुग्णांचे वय २४ वर्ष ते ४१ वर्षादरम्यान आहे. या रुग्णांपैकी कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नव्हता. यापैकी एकाने बंगळुरू आणि एकाने दिल्लीला प्रवास केला होता. तसेच मुंबई आढळलेल्या ७ रुग्णांपैकी एक व्यक्ती राजस्थानमधील आहे. या ८ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ जण घरी विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

सध्या मुंबईत ओमिक्रॉनचे १२ रुग्ण, पिंपरी चिंचवड १० रुग्ण, पुणे मनपा २ रुग्ण, कल्याण डोंबिवली १ रुग्ण, नागपूर १ रुग्ण, लातूर एक रुग्ण आणि वसई विरार एक रुग्ण आहे. यापैकी ९ रुग्णांची आरटी पी.सी.आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.