कोरोना रुग्णसंख्येची वाढ धडकी भरवणारी; राज्यात एका दिवसात २६ हजाराहून अधिक रुग्ण

6

मुंबई : राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात बुधवारी १४४ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. तसंच ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येची ही वाढ धडकी भरवणारी ठरत आहे. त्यामुळे राज्य आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ५३३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा आता ८७ हजार ५०५ वर पोहोचला आहे. राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा एकूण आकडा ७९७ इतका झाला आहे. तर ३३० जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

राज्यात बुधवारी १४४ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत आणि यात तब्बल १०० रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. नागपुरात ११ तर ठाणे आणि पुणे मनपामध्ये प्रत्येकी ७ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत बुधवारी तब्बल १५ हजार १६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या आकडेवारीपेक्षा तब्बल ३९ टक्के रुग्णवाढ आज मुंबईत नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईची दैनंदिन रुग्णसंख्या २० हजाराच्या घरात गेल्यानंतर शहरात लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, असं विधान मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल चहल यांनी केलं होतं. त्यामुळे रुग्णवाढ पाहता मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं होतंय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.