माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या, मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी तयार!
मुंबई: रोहित शर्माकडे वनडे कर्णधारपद सोपवण्यात आल्यानंतर विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिका खेळणार नसल्याची बातमी समोर आली होती. ही माहिती समोर येताच रोहित आणि विराट यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. मात्र आता स्वत: विराट कोहलीने या बातमीत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रोहित शर्मासोबत कोणतेही मतभेद नसून त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय खेळण्यास पू्र्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला “मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी तयार आहे. मी बीसीसीआयला विश्रांतीसाठी विचारले नाही. माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मला कोणीही टी-20 कर्णधारपद सोडण्यास सांगितले नाही. मी बीसीसीआयला एकदिवसीय कर्णधार म्हणून कायम राहण्याची विनंती केली होती”.
काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीने स्पष्ट केले होते की “आम्ही विराटला टी-20 कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती. पण त्याला या पदावर राहायचे नव्हते. त्यामुळे निवडकर्त्यांना त्यांच्याकडे व्हाइट बॉलच्या दोन्ही प्रकारात दोन कर्णधार असू शकत नाही असे वाटले.” पुढे बोलताना गांगुली म्हणाला “निवडकर्त्यांकडून रोहितने पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करावे आणि विराटने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करावे असा निष्कर्ष काढण्यात आला”.