चहापानाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, विरोधकांचाही बहिष्कार
मुंबई: राज्याचे विधानसभा हिवाळी अधिवेशन बुधवार २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली नाही. सह्याद्री या शासकीय ठिकाणी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला असल्यामुळे विरोधी पक्षातील नेते अनुपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर मंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर सोमवारी विधानभवनात पहिल्यांदा गेले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुख्यमंत्र्यांनी व्हिसीद्वारे उपस्थिती लावली होती. आजच्या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले नाही यामुळे विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री येणार की नाही? अशी चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नेहमी चहापानाचा कार्यक्रम होत असतो. परंतु पहिल्यांदाच विना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर सर्व मंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, शुभाष देसाई, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अनिल परब आणि धनंजय मुंडेंसह इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते.