संजय राऊतांचे थुंकणे वादात, अशा बेताल कृती करणाऱ्या राऊत यांना आता किती काळ प्रसिद्धी द्यावी हे ठरवण्याची वेळ आली आहे – श्रीकांत शिंदे

मुंबईः खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना उत्तर देण्याऐवजी केलेला थुंकण्याचा प्रकार वादात सापडला आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठवली जात असून महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे कळते आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार केल्याने राऊतांच्या कृतीवर टीका होते आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार संजय राऊत दररोज माध्यमांशी बोलताना शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदार यांच्यावर टीकेचे आसूड ओढत असतात. गुरूवारी संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसमोर थुंकण्याचा प्रकार केला. त्यानंतर गुरूवारी घाटकोपर येथील शाखा संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील एक कुटुंब उन्हाळ्यात गारव्यासाठी परदेशात जात असते, अशी टिका उद्धव ठाकरेंवर केली. खासदार डॉ. शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राऊत यांना विचारले असता त्यांनी पुन्हा त्या प्रश्नावर थुंकण्याचा प्रकार केला. या प्रकारानंतर शिवसेना आणि भाजपातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच राजकीय वर्तुळातही राऊतांच्या कृतीवर टीका केली जाते आहे. तर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली असून ही आपली राजकीय संस्कृती नव्हे अशा प्रतिक्रिया दिल्याचे कळेत आहे. काही महिन्यांपू्र्वी खासदार डॉ. शिंदे यांनी ठाण्यातील गुंडाना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप करत सनसनाटी निर्माण केली होती. त्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी राऊत यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाल्याची टीका केली होती. तेव्हापासून खासदार राऊत आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. मात्र राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीमुळे त्यांच्यावर टीका होते आहे.

याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विचारले असता, प्रसार माध्यमांनी अशा बेताल कृती करणाऱ्या राऊत यांना आता किती काळ प्रसिद्धी द्यावी हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. माध्यमांनी आता सीमा आखून घेण्याची गरज आहे. आपण नव्या पिढीला काय दाखवणार आहोत याबाबत भूमिका ठरवण्याची वेळ माध्यमांवर आली असल्याचेही डॉ. शिंदे म्हणाले.