महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या प्रश्नांशी राज्य सरकारला काही देणंघेणं नाही – जयंत पाटील

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत राज्य सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. राज्यात सातत्याने विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांचे निर्देश देणे, पंचनामे करून ताबडतोब मदत करणे, अशी कोणतीही भूमिका राज्य सरकार घेत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग संकटात असताना, तेथे मदतीची गरज असताना, सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसलेले आहे. देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण सरकार जातं हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय. महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या प्रश्नांशी सरकारला काही देणंघेणं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचे व त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचे काम सध्या हे सरकार करत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.