शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा – चित्रा वाघ

मुंबई: राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  सुरु झालं आहे. अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावेळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी म्हणजे काल (गुरुवारी) शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा हा कायदा मंजूर झाला आहे. यानंतर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर  निशाणा साधला आहे.

शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा,’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे, हे आमदार अजय चौधरी  यांच्या विधानातून दिसून आलं आहे. त्यांनी महिलांना अपमानित करणारी भाषा वापरलीय. माझी राज्य सरकारला विनंती आहे याची दखल घेत शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदार अजय चौधरींवर दाखल करावा,’ असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत चर्चा झाली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले. त्यावेळी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी भाजपला झोंबणारे विधान केले होते. याच मुद्द्यावरुन चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत.