अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; पेडणेकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज कामकाजाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशन सुरु झाले तरी सभागृहात उपस्थित राहिले नव्हते. यावरुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्याला, आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना तुम्ही विरोधी पक्षनेत्या करणार का? असा खोचक सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, माझे संस्कार सांगतात इतक्या मोठ्या व्यक्तीवर मी बोललं नाही पाहिजे. पण ते जर एक पत्नी म्हणून रश्मी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवणार का? असे म्हणत आहेत. मग ते अमृता देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देणार का? हे पहिले त्यांना विचारले पाहिजे कारण अमृता फडणवीस या अधिक चर्चेत असतात.

रश्मी ठाकरे या कधीही राजकीय चर्चेत नसतात असे असतानाही त्यांचे नाव घेतात. तुम्हाला कळतंय का स्त्रियांचे किती हनन करणार आणि तुम्ही सांगता आदर करतो. एकवेळ आदित्य ठाकरेंचे नाव घेतलं तर ठीक आहे कारण ते मंत्री आहेत असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, अमृता फडणवीस चर्चेत आहेत तर त्यांना बनवा, ज्या घरी आहेत. त्यांच्यावर टीका कशाला करताय? असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. हा प्रकार अजिबात करुन देणार नाही. राजकारणाची पातळी किती खाली आणणार आहात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली पाहिजे. महिलांचा अनादर करणे ही हिंदू संस्कृती नाही असा घणाघात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केला आहे.