मुंबई विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार; कोपरकरांचा उमेदवारी अर्ज मागे

मुंबई: मुंबई विधानपरिषद बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत दोन सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना आणि भाजपकडून या जागांसाठी अर्ज भरण्यात आला आहे. मात्र काँग्रेसकडून तिसरा अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. परंतु अखेर काँग्रेसकडून सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला असल्यामुळे मुंबई विधानपरिषदेच्या दोन जागांवर आता निवडणूक बिनविरोध होणार आहे.
मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी तर भाजपकडून राजहंस सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन जागांवर तिसरा उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी भरला होता. यामुळे ही निवडणूक होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कोपरकर यांनी आता उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्यामुळे बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेनेकडून सुनिल शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिंदे यांनी आमदारकी सोडली होती. याचे बक्षीस म्हणून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनिल शिंदे यांना आमदारकी दिली जाईल असे आश्वासन शिवसेनेकडून देण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने आपलं आश्वासन पुर्ण केलं आहे.