ओमिक्रॉनचा कहर! महाराष्ट्रात गेल्या 24 तासात सापडले 1600 नवे रुग्ण

मुंबई: कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग देखील झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी महाराष्ट्र, दिल्ली, जयपूर, गुरुग्राम आणि ओडिशामध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. रविवारी महाराष्ट्रात 1648 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात सध्याच्या घडीला 9,813 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात रविवारी 918 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12% एवढा आहे. राज्यात सध्या 89,251 रुग्ण हे होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रात आढळले ओमिक्रॉनचे 31 नवीन रुग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 31 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई 27, ठाणे 2, पुणे ग्रामीण 1, अकोला येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. यामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्क्रीनिंग दरम्यान आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांचा समावेश आहे. यापैकी 4 रुग्ण गुजरातमधील, 3 कर्नाटकातील, 2 रुग्ण केरळमधील आणि प्रत्येकी 1 रुग्ण दिल्ली, छत्तीसगड, यूपी, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील तर 2 परदेशी नागरिक आहेत. या सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. सोमवारी मुंबईत तब्बल 922 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत कोरोनाच्या 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 4295 सक्रिय रुग्ण आहेत.