संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा – चित्रा वाघ

मुंबई: गृहमंत्री साहेब कायदा सर्वांसाठी समान आहे तर मग तो आपल्या वर्तणुकीतून दिसत का नाही ? संजय राऊत गुलाबराव पाटलांना पाठीशी का घातलं जातंय. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबतचे पत्र चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना लिहिले आहे.

या पत्रात त्या म्हणतात, जितेन गजारिया यांच्या भाषेचं समर्थन करता येणार नाही. महिलांना अपशब्द वापरणा-यांवर कारवाई करायलाच हवी यात दुमत नाही. पण मग संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना जाहीरपणे शिव्या दिल्या. लाईव्ह प्रेक्षपणाच्या माध्यमातून प्रत्येक घरात आक्षेपार्ह वक्तव्य पोहोचले आहे. त्यावर गृहमंत्रालय मूग गिळून गप्प का बसलंय? गुलाबराव पाटील यांनी महिला खासदाराबद्दल अपशब्द वापरले. ते महिला लोकप्रतिनिधीची मानहानी करणारे नाही का? मग गुलाबराव पाटलांवर अद्याप कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी पुढे उपस्थित केला.

पुढे त्या म्हणतात, गृहमंत्री साहेब कायदा सर्वांसाठी समान आहे तर मग तो आपल्या वर्तणुकीतून दिसत का नाही ? संजय राऊत गुलाबराव पाटलांना पाठीशी का घातलं जातंय.. कारवाई करण्यासाठी आणखी किती वळसे घेणार आहात? हे आहे का महाविकास आघाडीचे शिवशाही सरकार ? माझा प्रश्न आहे की मुळात गृहमंत्री म्हणून आपलं काही चालतंय का ? सबळ पुरावे समोर असतानाही आपण कारवाई करत नाही. एवढी हतबलता का आहे ? गृहमंत्रालय नेमकं कोणाच्या इशा-यांवर काम करतेय. जर जितेन गजारिया दोषी असतील तर राऊत, गुलाबराव पाटीलही दोषी आहेत आणि त्याहूनही अधिक त्यांना पाठीशी घालणारं गृहमंत्रालय दोषी आहे. आपल्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. संजयजी राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!