देशात लसीकरणाचा 150 कोटींचा टप्पा पार; पंतप्रधानांनी मानले देशवासीयांचे आभार

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे कौटुंबिक, आर्थिक मोठं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तर काही जण मरणाच्या दारातून परत आले. एक नाहीतर गेल्या दोन अडीज वर्षांपासून हे कोरोनाचे भयंकर रूप सर्वजण पाहत आहेत. संसर्ग आटोक्यात आणण्याचे आव्हान केवळ प्रशासनच नाही तर लोकांसमोरही आहे. मात्र, या लढ्यात लसीकरणाचे अस्त्र देशाला मिळालं. अन् कोरोनाशी दोन हात करण्यास सुरुवात झाली. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेने मोठा टप्पा पार केला आहे.

शुक्रवारी लसीकरण मोहिमेने 150 कोटींचा टप्पा पूर्ण केला. देशातल्या प्रत्येक गावागावात लसीकरण मोहीम राबवल्याने तसेच लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला त्यामुळेच हा टप्पा गाठला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करता देशवासियांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी एक आवाहनही केलं.

ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात की, ‘लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस.. 150 कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन. लसीकरण मोहिमेने अनेकांचे प्राण वाचले. आपण सर्व जण यापुढेही कोरोना नियमांचे पालन करू. ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचा देश आभारी आहे. आमचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, नवोदित आणि लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. अजूनही काही जणांचे लसीकरण राहिले आहे. त्या पात्र नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन करत चला एकत्र कोरोनाचा सामना करू,’ असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.