पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करु नये – चंद्रकांत पाटील
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मेट्रोचा प्रवास केला आहे. शरद पवारांनी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडीदरम्यान मेट्रोनं प्रवास केला आहे. तसंच यावेळी शरद पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती घेतली. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी असा मेट्रो प्रवास केला आहे. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथे आले होते, याची माहिती प्रसारमाध्यमांना नव्हती. यावरुन चंद्राकांत पाटील म्हणाले पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांचा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल केला.
पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. अशाप्रकारे घाईघाईने ट्रायल करण्याचे कारण काय असा माझा प्रश्न आहे. यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? ११ हजार कोटींच्या या प्रकल्पामधील आठ हजार कोटी केंद्राने दिले आहेत. कोविडमुळे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. मेट्रोच्या ट्रायलला फक्त शरद पवार का?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आमदारांनी मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणला पाहिजे, असा संताप चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार अधूनमधून पुण्यातील विकासकामांची पाहणी करत असतात. यापूर्वी दोन वेळा भल्या सकाळी त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. आज चक्क शरद पवार यांनीच मेट्रोतून प्रवास केला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अचानक मेट्रो स्थानकाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. कामांमध्ये येत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. फुगेवाडी स्थानक ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत त्यांनी प्रवास केला. विशेष म्हणजे पवारांनी उभे राहूनच प्रवास केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व काही अधिकारी देखील त्यांच्या सोबत होते. फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली.