मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, भाषणात अडथळा आणणाऱ्या नितेश राणेंवर भास्कर जाधव संतापले
मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज विरोधक आणि सत्ताधारी एकमेंकावर जोरदार टीका करताना बघायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून सकाळी आंदोलन केले आहे. मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, भाषणात अडथळा आणणाऱ्या नितेश राणेंवर भास्कर जाधव चांगलेच संतापले आहे.
भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे. विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासावेळी हा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी बसूनच काहीतरी बोलण्याचा प्रकार केला. यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. मी मंत्र्यांशीच बोलत आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना काहीतरी शिकवा, अशी भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना विनंती केली. याआधीही या दोन नेत्यांमध्ये अनेकवेळा वाद झालेला पाहायला मिळाला होता.
आज सकाळपासूनच शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आक्रमक अंदाजात दिसत होते. अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाम सुरु होऊन जेमतेम २० मिनिटे झाली होती, तोच लक्षवेधीवरुन भास्कर जाधव यांनी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. माझ्या लक्षवेधीची मला उत्तरं मिळणार कधी, मला ती उत्तरं वाचून त्यावर प्रश्न विचारायचे आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले. त्यावर फडणवीसांनी मिश्किलपणे, भास्करांना वाचायची गरज काय, पाहिलं तरी तुम्हाला लगेच कळतं…, असं म्हणत गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न केला.