भास्कर जाधव हा चिपळूणचा लांडगा, रामदास कदमांचे जोरदार प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रविवारी खेड  येथील सभेत बोलताना रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. जाधव म्हणाले कि, रामदास कदम हा झपाटलेला सिनेमातला त्यात्या विंचू आहे. तो रोज सांगतो कि आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. याला साधं पर्यावरणही म्हणता येत नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. भास्कर जाधवांच्या या टीकेला रामदास कदम यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले.

रामदास कदम यांनी आज खेडमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, भास्कर जाधव हा चिपळूणचा लांडगा, हा बाडगा बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला आणि नंतर शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसुन शिवसेनेत आला. हा रामदास कदम पेक्षा स्वतःला निष्ठावान समजतो. हा एहसान फरामोश आहे.  २००९ मध्ये उद्धव ठाकरेंनी माझ्या पराभवाची सुपारी दिली होती. त्यामुळे तू निवडून आला. पण आता गाठ माझ्याशी आहे. पुढच्या निडणुकीत तुला गाडल्याशिवाय राहणार नाही , असे रामदास कदम यांनी म्हटले.
रामदास कदम पुढे म्हणाले कि, खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला. पण उद्धव ठाकरे १०० वेळा खेडमध्ये आले तरी योगेश कदमांना पाडू शकणार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हि खासगी कंपनी बनवून ठेवली होती. ते शिवसैनिक, आमदार, खासदार यांना नोकर समजत होते.