आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प – छगन भुजबळ
राज्यावर वाढत असलेला कर्जाचा बोजा साडे सहा लाख कोटींहून अधिक असताना प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता राज्यात नुकत्याच निवडणुकांमध्ये बसलेला फटका बघून राज्यातील जनतेला खूश करण्याच्या दृष्टीने आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन निव्वळ जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला, अशी प्रतिक्रिया आ. छगन भुजबळ साहेब यांनी व्यक्त केली आहे.
कांदा,कापूस,सोयाबीन, भाजीपाला आदी सर्व शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यात एकीकडे शेतकरी शेतमालाची होळी करत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस अशी कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अर्थसंकल्पातून तरी किमान आपल्याला मदत मिळेल याकडे आशा लावून बघत होता. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक शब्दही नाही. पंचामृतामधील थेंब काही त्यांच्या वाट्याला आला नाही, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.