अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? – अजित पवार

अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय? असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला.

सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजितदादा पवार यांनी उपस्थित केला व जातिवाद निर्माण करणार्या सरकारला खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे, असा सवाल त्यांनी केला.
ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रकाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागत असून जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असेही अजितदादांनी सरकारला ठणकावून सांगितले.
शेतकरी वर्गात वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक असतात. त्यांना जात विचारून खत देणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने वर्णभेदाची किती आग्रही भूमिका घेतली आहे हे या भूमिकेतून निष्पन्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. शेतकऱ्याला जात विचारण्याचे कुठलेही कारण नाही. त्यामुळे या गोष्टीचा करू तेवढा निषेध कमी आहे. सरकारने ही भूमिका रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे विधानसभेत आपली भूमिका मांडेल, असे ते म्हणाले. जातीचा, खताचा आणि शेतीचा कोणताही संबंध नसताना शेतकऱ्यांच्या जातिनिहाय संख्येचा आढावा घेऊन राजकारणातील पुढील पावले टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.