२८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही – जयंत पाटील
भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला आहे असून २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भाजप असेल शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
भाजपला स्थानिक पक्ष, राज्यस्तरावरील पक्ष, त्यांचे अस्तित्व त्यांना मान्य नाही. भाजपला असं वाटतंय की आपली मते हे पक्ष खाणार आहेत त्यामुळे स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम अव्याहतपणे प्रत्येक राज्यात भाजपने केले आहे. त्यांचा मित्र असो या शत्रू असो त्यांना फोडणे त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोहरम करुन त्यांच्या मागे जाणारी मतं आपल्या मागे वळवणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.