संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले.. गजानन किर्तीकर यांची या पदावर निवड

शिवसेनेचे  ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले आहे. शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची तेथे निवड करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे दोन्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत संसदीय नेतेपदी गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आली होती. याबाबतची माहिती आज लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून कीर्तिकर संसदेत व्हीप काढू शकतात. कीर्तिकरांचा व्हीप संजय राऊत यांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊत यांची खासदारकी जाऊ शकते.

संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर लोकसभेत एकूण १८ खासदारांपैकी  शिंदेंच्या शिवसेनेसोबत १३ खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत ५ खासदार आहेत. राज्यसभेत एकूण ३ खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. आता या निर्णयावरून संजय राऊत काय भमिका घेणार हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.