अमरावती : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती प्रत्येकजण कृतज्ञ आहे. यासाठीच शुक्रवारी अमरावती जिल्ह्याच्या नियोजन बैठकीनंतर जिल्ह्यातील अशा थोर स्वातंत्र्यसैनिकांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यथोचित सन्मान करुन, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर शासनामार्फत स्वातंत्र सैनिक व विधवा पत्नी यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आला.
यावेळी स्वातंत्र सैनिक तसेच त्यांचे जोडीदार यांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये केंद्र शासनाचे स्वातंत्र सैनिक मुलायमचंद गणपतलाल जैन यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच स्वातंत्र सैनिकांच्या विधवा पत्नी श्रीमती इंदिराबाई महादेवराव बरवे, श्रीमती सीताबाई माणिकराव अडसड, श्रीमती कमलाबाई महादेव गुल्हाने, श्रीमती सरलाबाई माणिकराव निर्मळ, श्रीमती कमलवीर प्रकाश बनारसे तसेच श्रीमती सुमित्रादेवी अयोध्याप्रसाद गंगेले यांना मानपत्र, शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन पाटील यांनी सन्मानित केले.
खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, खासदार रामदास तडस, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार, आमदार राजकुमार पटेल यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.