जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य व जिल्हा परिषदस्तरीय प्रमुख कार्यान्वयन यंत्रणांच्या विकास कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

61
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. याप्रसंगी आदिवासी घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग यांना सन २०२२-२३ मधील आदिवासी क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.
आदिवासी क्षेत्रात शासकीय विभागांच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तरतूद करण्यात येते. त्याअंतर्गत आदिवासी घटक योजनेतील सर्व विभागांनी सन 2022-23 ची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी निर्धारित काळात निधी खर्च करुन विकास कामे पूर्ण करावीत. नजिकच्या काळात या विकास कामांची पाहणी करण्यात येईल. पाहणीच्या वेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणाचे विभागप्रमुख उपस्थित राहतील, असे पाटील यावेळी म्हणाले.

सर्वसाधारण योजनेंतर्गत वन विभागाच्या विविध विभागांचा यावेळी आढावा घेतला. आदिवासी विभागातील पेसांतर्गत निधी, कृषी पंपाची विद्युत जोडणी, अमृत आहार योजना आदी विविध योजनांबाबत यावेळी माहिती घेण्यात आली. वन्यजीव व्यवस्थापन व निसर्ग संवर्धन कामे करताना वन विभागाने जिओ टॅगिंग करावे. जेणेकरुन वन विभागामार्फत करण्यात आलेली विकास कामे नागरिकांना ऑनलाईन बघता येईल. येत्या काळात आदिवासी विभागातील कोणत्याही दोन तालुक्यांची निवड करुन त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात येईल. त्या अनुषंगाने वन विभागातील विकास कामांचा आढावा प्रशासनामार्फत घेण्यात येईल.  केंद्र शासनाकडे वन विभागाचा प्रलंबित विकास कामांचा प्रशासनामार्फत पाठपुरावा करावा, असे पाटील म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत वनविभागाच्या पाचही विभागाचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे सन 2023-24 वरील प्राप्त निधी व खर्चाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. तसेच सन 2023-24 चा निधी विहित कालावधीत खर्च होईल, ही दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, असेही पाटील यावेळी म्हणाले.

याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व्यवहारे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.