महिला बचत गटांच्या उत्पादनाला ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

26

अमरावती : महिला आर्थिक विकास महामंडळ (महाविम) अमरावती यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या “मेळघाट हाट” या नैसर्गिक उत्पादनांच्या विक्री केंद्राचे उद्घाटन गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमरावती लोकसभेच्या खासदार श्रीमती नवनीत राणा देखील उपस्थित होत्या.

मेळघाट क्षेत्रातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाला ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा अभिनव उपक्रमांना सर्व स्तरावरून प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन पाटील यांनी येथे केले.

पाटील म्हणाले कि, मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले आहे. या मॉलच्या माध्यमातून उत्पादित वस्तू थेट ग्राहकांना विक्री करुन बचत गटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना वनौषधी, बांबूपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, जंगली मेवा, मध यासारख्या वस्तूंची खरेदी करता येईल. आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन आदिवासी क्षेत्रात जास्तीत-जास्त बचत गटांचे जाळे निर्माण करावे. महिलांची कला-कौशल्ये तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन वाढवून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विक्रीसाठी आणलेल्या साहित्याला योग्य भाव मिळण्यासाठी विक्री साहित्याचे उत्तम मार्केटिंग, पॅकिंग व ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षित करावे. उत्पादित मालांना राज्यसह देशात बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल. मेळघाट क्षेत्रातील महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

 कार्यक्रमाची सुरुवातीला आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर मेळघाट हाट उद्घाटनाच्या कोनशिलेचे अनावरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी मेळघाट हाट मॉलमधील विक्री साहित्याची पाहणी करून याबाबत महिला बचत गटांच्या महिलांकडून माहिती जाणून घेतली. तसेच विविध वस्तूंची खरेदीही केली. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन क्षिप्रा मानकर यांनी केले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे आदी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.