यंत्रमागधारकांना उभारी देण्यासाठी समितीच्या माध्यमातून शासन सकारात्मक निर्णय घेणार –  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

5

नाशिक : नाशिक जिल्हयातील ‘यंत्रमाग नगरी’ म्हणून परिचित असणाऱ्या मालेगाव मधील यंत्रमाग कारखान्यांना आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मालेगावातील यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार पालकमंत्री दादा भुसे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. दरम्यान समितीने सादर केलेल्या अहवालाची दखल घेत, शासनाकडून याचा गांभीर्यपूर्वक विचार करुन यंत्रमागधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.

देशात शेतीनंतर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती यंत्रमाग व्यवसायाच्या माध्यमातून होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रमागधारकांना, वस्त्रोद्योग व्यवसायाला व लघुउद्योगाला उभारी देण्यासाठी समितीच्या अहवालाच्या माध्यमातून शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासनस्तरावर एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे. यानुसार वस्त्रोद्योग धोरणात आवश्यक असलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या अनुषंगाने वस्त्रोद्योग विकासाला चालना देण्यासाठी यंत्रमाग व्यवसाय व त्यासंबंधित काम करणा-या कामगारांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी यंत्रमागधारकांनी टेक्सटाईल पार्क, यंत्रमाग उद्योगांना कामगार सबसिडी, वीज व वीजमीटर समस्या, कामगारांच्या समस्या यासह सर्व वस्त्रोद्योग घटकांसंबंधी समस्या पाटील यांच्याकडे मांडली. त्याअनुषंगाने यंत्रमागधारकांनी मांडलेल्या यंत्रमाग व्यवसायासंदर्भात विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच वीज सवलत मान्य करण्यात आली असून यंत्रमागधारकांना कच्चा माल योग्य दरात मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, नोंदणीकृत कामगारांना पेन्शन देण्याचे नियोजन आहे. तसेच आनंदाचा शिधासोबत साडीही देण्याचे नियोजन आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील मुलींना मेडीकल, इंजिनिअरींग, लॉ, पॉलीटेक्नीक ,एमबीए सहीत कोणत्याही कोर्ससाठी माहे जूनपासून फी भरावी लागणार नसल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद, मुंबई वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक खांडेकर, नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तलयाचे सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) गणेश वंडकर, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या., मुंबईचे प्रशासकीय अधिकारी विजय पुजारी, वस्त्रनिर्माण निरीक्षक गजानान पात्रे, लेखाधिकारी ज्ञानेश्वर टिके, तांत्रिक सहाय्यक एस.बी. बर्मा, यंत्रमाग संघटनेचे चेअरमन साजिद अन्सारी यांच्यासह पदाधिकारी, कामगार व नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.