एकल माता, एकल विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव – मंत्री चंद्रकांत पाटील

6

कोल्हापूर : वडिलांच्या छत्रछायेनंतर आपल्या पाल्यांच्या शिक्षण आणि भवितव्यासाठी जिद्दीने संघर्ष करणाऱ्या एकल मातांना खंबीर आधार देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एकल माता, एकल विद्यार्थी’ हा एक अत्यंत संवेदनशील उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी या माता व त्यांच्या पाल्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांना सणानिमित्त खास भेटवस्तूंचे वितरण करत त्यांच्या आनंदात सहभाग घेतला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणासाठी ₹१० हजारांपर्यंतची आर्थिक मदत आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी आवश्यक औषधांवर ५० टक्के सवलत देण्याची महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ सणापुरता किंवा तात्पुरता मर्यादित नसून, दर दोन महिन्यांनी या कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या गरजेनुसार अखंडपणे मदतीचा हात दिला जाईल. तसेच प्रत्येक सणाला पूरक भेटवस्तू देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा संकल्प मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

सध्या या उपक्रमांतर्गत १४५ एकल मातांची नोंदणी झाली असून, अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वेक्षण आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

या प्रसंगी सौम्या तिरोडकर, जुहीताई कुलकर्णी, वृंदा सलगर, शिवाली निंबाळकर, विजय जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.