कोल्हापुरात भाजपचे ‘प्रबुद्ध भारत संमेलन’ संपन्न; राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश जी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ‘विकसित भारत २०४७’ वर मार्गदर्शन
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित ‘प्रबुद्ध भारत संमेलन’ भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
‘विकसित भारत २०४७’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित या संमेलनात केंद्र व राज्य शासनाच्या जनहितकारी योजना, राष्ट्रनिर्माणातील नागरिकांची भूमिका आणि प्रबुद्ध समाजाचे महत्त्व यावर सकारात्मक संवाद आणि सखोल विचारमंथन करण्यात आले. देशाच्या प्रगतीसाठी आणि ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या विचारांवर उपस्थित सर्वांना यावेळी मंत्री शिवप्रकाश आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना शिवप्रकाश म्हणाले, जनसंघापासून भारतीय जनता पक्षाने ‘अंत्योदय’ हा विचार केंद्रस्थानी ठेवला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य मोदी सरकारने सातत्याने केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आहे. महिला सक्षमीकरण आणि महिला सन्मानाच्या क्षेत्रातही मोदी सरकारने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, उज्ज्वला योजना, मातृत्व लाभ योजना, महिला स्वयं सहायता गटांना दिलेले बळ, तसेच महिलांसाठी संसद व विधानमंडळांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ यांसारख्या निर्णयांमुळे देशातील महिलांचा आत्मविश्वास आणि सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ बनविण्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी समाजातील प्रबुद्ध, सुशिक्षित आणि विचारवंत वर्गाने शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असेही मंत्री शिवप्रकाश यांनी सांगितले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेल्या विविध विकासकामांची आणि उपलब्धींची माहिती उपस्थितांना दिली. खासदार धनंजय महाडिक यांनी आभार मानले.
कार्यक्रमास मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समरजितराजे घाटगे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, राहुल चिकोडे, योगेश बाचल, मुरलीधर जाधव, माधुरी नकाते उपस्थित होते.