इंधनबचतीचा आदर्श! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगली दौऱ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहकाऱ्यांसह एकाच वाहनातून प्रवास

13

सांगली : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराची मोठी धामधूम सुरू आहे. या धावपळीच्या आणि प्रचाराच्या लगबगीतही राष्ट्रीय कर्तव्याचे भान राखत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनबचतीचे विशेष आवाहन केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातील प्रचारदौऱ्यात वैयक्तिक वाहनांचा ताफा टाळून मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह एकाच वाहनातून प्रवास केला.

निवडणूक काळात साधारणपणे राजकीय नेत्यांच्या गाड्यांचे मोठे ताफे पाहायला मिळतात. मात्र, चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याला फाटा दिला. आम्ही प्रचाराच्या घाईगडबडीत असलो, तरीही देशासमोरील इंधनबचतीचा संकल्प आणि राष्ट्रीय आवाहन विसरलेलो नाही, असे सांगत मंत्री पाटील यांनी या उपक्रमाद्वारे इंधनबचत आणि पर्यायाने पर्यावरण संवर्धन असा दुहेरी हेतू साध्य केला.

यावेळी मंत्रिमंडळातील ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकरही सांगली ते जत आणि जत ते विटा प्रवासात पाटील यांच्या सोबत होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक संघटनात्मक विषय, विविध विकासकामांबाबत माहिती अद्ययावत झाली. ग्रामीण भागासाठी आणखी काय उपक्रम घेता येतील, त्या त्या भागांतील रहिवाशांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजांचं प्राधान्य अशा मुद्द्यांवरही विचारांची देवाण-घेवाणही या एकत्र प्रवासामुळे होऊ शकली, असे पाटील यांनी सांगितले.

दौऱ्याच्या सांगतेनंतर आपल्या भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनानुसार इंधनबचतीमध्ये छोटासा वाटा उचलता आला, याचं समाधान देणारा हा प्रवास होता. मोदीजी, तुम्ही केलेलं इंधनबचतीचं आवाहन आम्ही तुमचे शिलेदार नक्कीच कायम लक्षात ठेवू.

Get real time updates directly on you device, subscribe now.